युतक LGBTQ ट्रस्ट पुणे यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी १४ एप्रिल रोजी महात्मा फुले वाडा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन अशी अभिवादन पदयात्रा आयोजित केली होती.
पदयात्रेचा तपशिल:
दिनांक: १४ एप्रिल २०२५
वेळ: सकाळी ८:३० ते १०:००
मार्ग: या अभिवादन पदयात्रेची सुरुवात महात्मा फुले वाडा, म्हणजेच समता भूमी इथून लोहिया नगर मार्ग, नेहरू नगर रोड, रामोशी गेट, नरपती गिरी चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन असा होता.
सहभागी: पहिल्यांदाच झालेल्या या पदयात्रेत एकूण १९ व्यक्तींनी सहभाग नोंदवला.
उद्देश: डॉ. बाबासाहेब यांच्या सर्वसमावेशक दूरदृष्टीला सलाम करून एलजीबीटीक्यू समुदायाने या पदयात्रेच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली. सामाजिक न्याय आणि समानतेसाठी आंबेडकरांनी केलेले प्रेरणादायी काम LGBTIQ समुदायासह अनेक वंचित-उपेक्षित समुदायांना प्रेरणादायी ठरले आहे. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या समानता आणि स्वातंत्र्याच्या तत्त्वांमुळे भारतातील LGBTQ चळवळीला आधार मिळाला आहे. यामुळेच भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिले आणि संसदेने कायदे तयार केले, जसे की:
१. एप्रिल २०१४ मध्ये तिसऱ्या कायदेशीर लिंगाला मान्यता (एनएलएसए विरुद्ध UOI)
२. नवतेज सिंग जोहर विरुद्ध UOI (आयपीसी कलम ३७७ प्रकरण).
३. तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९.
४. तृतीयपंथी व्यक्तींना विवाहाचा अधिकार (सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध भारत सरकार, २०२३).
अनिल उकरंडे यांनी संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व सहभागींचे सुरुवातीला स्वागत केले. जमलेल्या सहभागींनी एकत्रपणे महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकांना अभिवादन केले. अभिमान पदयात्रेचा उद्देश, पदयात्रेचा मार्ग, नियम व अटी यांची कल्पना दिली आणि त्यानंतर सकाळी ८:३० वाजता या पदयात्रेची सुरुवात समता भूमी, महात्मा फुले वाडा इथून झाली. साडेनऊ वाजता ही पदयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी पोहोचली. समूहाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. वैदेही, प्रीती व त्रिनय या पारलिंगी व्यक्ती आणि बिंदुमाधव खिरे, मयूर पटारे, सुरेश खोले, विनोद या समलिंगी व्यक्तींनी समूहाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना वाचून या अभिवादन पदयात्रेची सांगता करण्यात आली.
या अभिवादन पदयात्रेस विशेष सहकार्य करणाऱ्या खडक पोलीस स्टेशन, समर्थ पोलीस स्टेशन आणि बंड गार्डन पोलिस स्टेशन या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची आम्ही आभारी आहोत.
या अभिवादन पदयात्रेत सहभागींनी “फुले, शाहू, आंबेडकर, येथे जुळती आमचे कर. एकच साहेब, बाबासाहेब! भारत आमची माऊली, संविधान त्याची सावली. कल हो, आज हो, समानता का राजा हो!” अशा घोषणा दिल्या.